Thursday, 18 January 2007
लक्ष्मीची पाउले
१८५७ मध्ये रामगढची राणी अवंतिका, झिनतमहल, आलिया बेगम तसेच अझिझन यांनी शस्त्र धारण केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला सैनिकांच्या दोन तुकड्या लढल्या. त्यांचा पाडाव झाल्यावर इंग्रजांनी त्या दोघींना गोळ्या घालून ठार केले. विसाव्या शतकात क्रांतिचा वणवा पेटल्यावर अनेक ज्वाला प्रदिप्त झाल्या. हार्डिंग्जच्या वधासाठी बाँबस्फ़ोट करून १९११ साली राश बिहारी बोस यशस्वीरित्या निसटले. ते लाहोरला जाणारच असा कयास असलेल्या पोलिसांनी त्यांना तिथे लपता येउ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली. अनोळखी व एकट्या तरुणाला आसरा देउ नये असा फ़तवा पोलिसांनी काढला तेव्हा राश बिहारी यांचे विश्वासू साथिदार राम मोहन यांची पत्नि वासंतीदेवी हिने राश बिहारिंची पत्नि असल्याचे नाटक करून त्यांना महिनाभर आश्रय दिला. राश बिहारी तिथुन पूर्वेकडे जाण्यासाठी भारताबाहेर निसटले. फ़ितुरीने ही बातमी पोलिसांना समजली. त्यांनी वासंतिदेवींचा अमानुष छळ केला, अखेर त्यांनी कसलीही माहिती न दिल्याने पिसाळलेल्या इंग्रजांच्या हुकुमाने बलुची रेजिमेंटने सामुहीक बलात्कार केला व त्यात वासंतीदेवी मरण पावल्या. १९१५ मध्ये इंडो-जर्मन कट फ़सल्यावर परागंदा झालेल्या अमरेंद्र चटर्जि, जदुगोपाल मुखर्जी, अतुल घोष इत्यादिंना नानीबाला घोष नामक विधवा स्त्रीने आपल्या घरात आश्रय दिला इतकेच नव्हे तर तिने सौभाग्यालंकार अंगावर चढवून ती अलिगढ तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या रामचंद्र मुजुमदार याची पत्नि बनुन त्याला तुरुंगात भेटायला गेली व सांकेतिक भाषेत त्याच्याशी बोलुन तीने त्याने लपविलेल्या दोन मॉवजर रिवॉल्वर्सचा ठावठिकाणा बाहेर येउन त्याच्या साथिदारांना सांगितला. याच सुमारास पोलिस उप-अधिक्षक वसंत चॅटर्जी याच्या खुनाच्या कटाबाबत फ़रारी असलेले क्षितिज चौधरी व सुरेन्द्र मोहन घोष यांना क्षिरोसुंदर चौधरी या विधवा स्त्रीने त्यांची आइ बनून आसरा दिला. मास्टर सूर्यसेन व त्यांच्या साथिदारांना सावित्री चक्रवर्ति व क्षिरोद प्रभा विश्वास यांनी आश्रय दिला. या दोघी तसेच नानीबाला यांना त्यबद्दल काही वर्षे तुरुंगवास पतकरावा लागला. १९३० ते १९४० हे दशक गाजविले ते बंगालच्या वाघिणींनी. १९३१ साली ज्यांना आपल्या हडकुळ्या बोटांनी अंगठ्याचा आधार घेतल्याशिवाय पिस्तुलाचा घोडा ओढता येत नव्हता अश्या अवघ्या १३ वर्षाच्या मुली सुनिती चौधरी आणि शांति दास यांनी कोमिल्लाचा जुलुमि कलेक्टर स्टिवन्स याला अगदी समोरून गोळ्या घातल्या व त्यांना ८ वर्षे कैदेची सजा त्या लहान वयातही दिली गेली. सतत क्रांतिकारकांच्या सहवासात असलेल्या पारुल मुखर्जीला १९३२ साली एक वर्ष नजरकैदेत ठेवुनही ती पुन्हा क्रांतिकारकांना सामिल झाली. २० जानेवारी १९३५ साली तिच्या घरावर पोलिसांनी धाड घातली तेव्हा त्यांना तिथे भरपूर स्फ़ोटके सापडली. तुरुंगात त्यांचा छळ केला गेला, एका पोलिस अधिकाऱ्याने बलात्काराचा प्रयत्नही केला, मात्र पारुल मुखर्जी यांनी धैर्याने प्रतिकार केला व त्याच्या तोंडावर पायातली वहाण मारुन सुटका करुन घेतली. त्याच तुरुंगात (टॉलीगंज पोलिस ठाणे) असलेल्या सांतीसुधा यांनी एका पोलिसाला आपल्या सोन्याच्या बांगड्या दिल्या व त्याच्या करवी ही बातमी बाहेर वर्तमान्पत्रांपर्यंत पोचवली. फ़ार गाजावाजा झाल्यामुळे पारुल मुखर्जी यांना दुसरीकडे हलवीले गेले. मुळची अयर्लंडची कॅथरिन इथे येऊन सरला देवी झाली व तिने एच एस आर ए च्या कार्यात वाहुन घेतले. त्यांना यशपाल यांच्यासह १९३२ साली अटक झाली व यशापाल कपूर यांना आश्रय दिल्याबद्द्ल ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. प्रितिलता वड्डेदार ने मास्टर सूर्यसेन यांच्या खांद्याला खांदा लावुन सशत्र चकमकित भाग घेतला व पहाडतळी क्लब वरील हल्ल्याचे नेतृत्त्व केले. २४ सप्टेंबर १९३२ रोजी युरोपिअन क्लब वर हला करून तीने आपल्या साथिदारांसह ११ गोरे ठार केले तर अनेक जखमी केले. पोलिसांच्या हाती पडण्याऐवजी तिने सायनाइड घेउन मरण पत्करले. अखेच्या प्रसंगी तिच्या मृतदेहाबरोबर पोलिसांना एक चीट्ठी सापडली, तिच्यात ५ प्रश्न होते, सर्वांचा रोख एकच - ' स्त्रियांना पुरुषंच्या इतकाच हक्क असताना त्यांना सशस्त्र क्रांतीपासून दुर का ठेवले जात आहे?'. कैलासपती या एच एस आर ए सदस्याने आपल्या प्रेयसीला आपल्या बरोबर आणले होते, पुढे त्याचे संघटने कडे दुर्लक्ष्य झाले व नंतर तो फ़ितुरही झाला. यामुळे आजादांनी स्त्रियांना मनाइ केली होती, त्या अनुशांगाने हे प्रश्न होते. १९३४ साली नेताजिंचे शिक्षक वेणीमाधवदास याची कन्या बिना दास हिने स्टॅन्ले जॅक्सन याला गोळ्या घालाचा प्रयत्न केला व तुरुंगवास पत्करला तर ८ मे १९३४ ला उज्ज्वला मुजुमदार हिने बंगाल गव्हर्नर जॉन अँडरसन याला गोळ्या घातल्या. लीला नाग, सुशीला दासगुप्ता, हेलेना गन, लावण्या दासगुप्ता व रेणु सेन यांना बॉम्ब व काडतुसे जमविण्याच्या आरोपावरुन अटक व तुरुंगवास झाला. बड्या बापाची बेटी असलेल्या कल्पना दत्त ने चित्त्गांव शस्त्रागार लुटायच्या मोहिमेत भाग तर घेतलाच पण पुढे जेव्हा अनेक जण पकडले गेले तेव्हा त्यांनी टिटाघर तुरुंगात सुरुंगस्फ़ोट घडवुन पलायन करायचा कट केला तेव्हा कल्पना दत्तने आपल्या घरावर कुणाचे लक्ष नसेल याचा फ़ायदा घेत 'युगान्तर समिति' च्या रेणू राय व कमल मुखर्जी यांच्या मदतिने सुरुंगाची दारु जमवली होती. हा कट उघडकिस आला तेव्हा पोलिसखाते हादरले होते इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरुंगाची दारु या मुलिंनी जमवली होती. इशान्येत ३१ च्या अखेरिस जदो नांग फ़ाशी गेल्यावर राणी गायडिनलु हिने १९३२ साला पासून ब्रिटिशांशी झुंज दिली व अनेक वर्षे तुरुंगवासही पत्करला. पुढे स्वातंत्र्या प्राप्तिनंतरही तिचा न्याय व समता यासाठी लढा व तुरुंगवास सुरुच राहीला. ती कुठल्याही संस्थानची राणी नव्हती तर तिच्या कार्याखातर नागभूमिचे लोक तिला आदराने राणी म्हणत. अर्थात सर्वात कळस म्हणून जिचा उल्लेख करावा अशी स्त्री क्रांतिकारक म्हणजे भगवतिचरण वोरा यांची पत्नि दुर्गावती. तीने आयुष्यभर क्रांतिकारकांची साथ दिली, अनेकांना आसरा दिला, अनेकांची सुश्रुषा केली अनेकांना अन्न दिले व वेळ आली तेव्हा भगतसिंहाला लहोरच्या बाहेर काढण्यासाठी तिने आपल्या लहान मुलासह त्याची पत्नि बनुन लाहोर ते कलकत्ता असा प्रवास केला. २८ मे १९३० रोजी स्फ़ोटकांची चाचणी घेताना भगवतिचरण मरण पावले, मात्र दुर्गावतिंनी शोक न करता आजादांकडे असा हट्ट धरला कि १ जून ला भगतसिंहाला बोर्स्टल तुरुंगतून ठरल्याप्रमाणे सोडवाचा प्रयत्न करायचाच; मात्र भगवतिचरण यांची उत्तराधिकारी म्हणून पोलिस व्हॅन वर बाँब त्या स्वतः टाकणार! त्यांना नकार मिळताच भगवतिचरण यांची बहिण सुशिलादिदी हिने ते काम स्वतःला मिळावे अशी गळ घातली. मात्र तुमची मदत क्रांतिकारकांना पुढे लागेल तेव्हा आता तुम्ही कृतिमद्ध्ये उतरू नका अशी आजादांनी त्यांची समजुत घातली. अर्थातच सुटकेचा प्रयत्न फ़सला व सर्वांनी तातडिने लाहोर सोडून निरनिराळ्या ठिकाणी जायचे ठरले. तेव्हा मात्र पति-निधनानंतर आवरलेले अश्रू दुर्गावती आवरू शकल्या नाहीत. जाताना त्यांनी आपले सर्व दागिने आजादांच्या हाती ठेवले आणि त्यांना सांगितले कि त्यांच्यापेक्षा संघटनेला या पैशाची अधिक गरज आहे. त्या प्रसंगी आजादांसारखा पहाडी मनुष्य त्यांच्या पायावर डोके ठेवुन रडला होता. ७ ऑक्टोबर १९३० साली भगतसिंह, राजगुरु व सुखदेव यांना फ़ाशीची शिक्षा सुनावली गेली. मात्र कितिही क्रांतिकारक फ़ासावर गेले वा गोळ्यांना बळी पडले तरी उरलेले भिणार नाहीत व कार्य चालूच ठेवतील हे दाखविण्यासाठि ८ ऑक्टोबर १९३० रोजी क्रांतिकारकांनी मुंबई पोलिस आयुक्तावर हला करायचा ठरवला. माहोर यांनी दुर्गावतिंचा लहान मुलगा शचिंद्र याला दादर येथे आपल्या ओळखिच्या कुटुंबाकडे नेउन ठेवले. बापट यांनी एक गाडी मिळवली व ते ड्रायवर झाले. बरोबर होते पृथ्विसिंह, सुखदेवराज व पुरुषवेष धारण केलेल्या दुर्गावती. त्यांनी आयुक्त हिली यांना ठार करण्यासाठी आयुक्तालयाकडे कुच केले पण कडक पहार्यामुळे ते शक्य नसल्याचे त्यांना समजले. मग त्यांनी दुसऱ्या पोलिस ठाण्यावर हल्ला कराचे ठरवले. त्यांनी थेट लॅमिंग्ट्न रोड पोलिस ठाणे गाठले. तिथे त्यांना पोलिस निरिक्षक टेलर पत्निसह येताना दिसला. पृथ्विराज व दुर्गावतिंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या तर बापट यांनी पाठलाग होउ नये म्हणून टेलर च्या मोटारीच्या चाकावर गोळ्या झाडल्या व य्शस्वी पलायन केले. मग त्या मुलासह झाशी येथे निघुन गेल्या. मुंबैची बातमी व स्त्रीच्या सहभागाविषयी ऐकताच आजाद समजले कि हे काम दुर्गावतिंचेच. पुढे त्यांनी लखनौ येथे माँटेसरी शाळा चालवली.
क्रांतिकारकांइतकेच महत्त्व आहे ते त्यांच्या कुटुंबातिल स्त्रीयांचे. चाफ़ेकर, सावरकर, भगतसिंह, आजाद, वगरे सर्व क्रांतिकरकांच्या माता वा पत्निंनी अनन्वीत हाल सहन् करुनही त्यांच्या कार्यावर अखेरपर्यंत निष्ठा ठेवली. लाहोर तुरुंगात भगतसिंह व सर्व सहकऱ्यांनी आमरण उपोषण सुरु केले. काही दिवसातच राजगुरु यांचे वजन ३० पौण्डांनी घटले. त्यांच्या मातोश्रींना बोलावले गेले. त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई या अत्यंत गरिब होत्या. कुठे पुणे आणि कुठे लाहोर. लोकांनी पैसे जमवून त्यांना लाहोरचे तिकिट काढुन दिले. भयंकर थंडी, परका मुलुख, परकी भाषा करणार तरी काय? मात्र त्यांना बाबुराव व यमुताई भाटवडेकर यांनी सरकारी नोकर असुनही आपल्या घरात ठेवून घेतले. यमुताइ राजगुरुंना भाउ मानत असत. त्यांनी पार्वतीबाइंना तुरुंगात नेउन राजगुरुंची भेट करवून दिली. ह्या हकिकती कुणालाच माहित नाहीत याउलट 'लाडका पुत्र तुरुंगात गेल्यावर वडिलही आपल्या राजवाड्यात गादी ऐवजी चटईवर झोपु लागले' अशा ष्टोऱ्या आपल्याला पाठ्यपुस्तकात शिकवल्या गेल्या. भगतसिंह, राजगुरु व सुखदेव फ़ाशी गेल्यावर लाहोर येथे विराट सभा झाली. त्या सभेत लोकांनी हुतात्म्यांच्या नातेवाइकांना पहायचा आग्रह धरला. प्रथम भगतसिंहांच्या मातोश्री विद्यावतींनी दर्शन दीले. मग लोकांनी यमुताइंना आग्रह झाला. त्या संकोचामुळे पुढे जात नव्हत्या. मग लोकांनी त्यांना आग्रहाने विनवून सांगितले की त्या एकट्या राजगुरुंच्याच नव्हेत तर १५ क्रांतिकारकांची बहिण होत्या. सर्वात खडतर आयुष्य भगतसिंहाची माता विद्यावती हिचे. पहिले मूल जन्मताच गेले. लाडका भगतसिंह २४ व्या वर्षी फ़ाशी गेला. पाठोपाठ सासरे अर्जुनसिंह गेले. १५ ऑगस्ट १९४७ च्या पहाटे तिचे अर्धे आयुष्य स्वातंत्रासाठी देशाबाहेर परगंदा असलेले दिर अजितसिंह गेले. मग पती किशनसिंह गेले. दुर्दैव इथे संपले नव्हते. ४७ नंतर काळ्यापाण्याचे कैदि मुक्त झाले तेव्हा बटुकेश्वर दत्त सुटुन आले. ऐन उमेदित राष्ट्राला वाहून घेतलेले त्यामुळे शिक्षण नाही, सरकारला त्यांचे देशभक्त असणेच मान्य नाहि. मग ते कसेबसे उपजिवीका करीत जगले. १९६५ ला ते अखेरच्या क्षणी विद्यावतिंच्या चरणाशी आले आणि तिथे त्यांनी प्राण सोडले. त्यांनी विद्यावतींना आइ मानले होते. त्यांनी आइला आपली शेवटची इच्छा अशी सांगितली कि त्यांचे अंत्यसंस्कार भगतसिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या स्मारकाशेजारी (गुजरान्वाला) येथे व्हावेत. त्या मातेने तीही इच्छा पूर्ण केली.
अशा असंख्य स्त्रियांच्या त्यागाने हे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना नम्र अभिवादन.
नाही चिरा नाही पणती..

चंद्रशेखर सिताराम तिवारी. जन्म भॉवरा, जिल्हा झाबुआ, मध्य प्रदेश. एका सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेला सामान्य मुलगा. शिक्षणात लक्ष्य बेताचेच. आदिवासी मुलांबरोबर जंगलात उनाडणे आणि तिरकमठा चालवणे हेच अधिक प्रिय. मात्र स्वभाव अगदी सरळ आणि रोख ठोक. एकदा शिक्षक मनोहरलाल त्रिवेदिंनी मुलांची परिक्षा घेण्या करिता एक चुकीचा शब्द घातला. बंधु शुकलालने तो तात्काळ सुधारुन सांगीतला पण याने मात्र शब्द पुरा होण्या आधिच समोरची छडी उचलली आणि हाणली मनोहरलालजींना. आम्ही चुकलो तर ते मारतात, आज ते चुकले तर आम्ही का मारु नये हा प्रश्न!
मन शाळेत वा गावात रमले नाही, मग गेला मुंबैला. तिथेही काही चैन पडेना. तिथून स्वारी काशीस पोचली. अध्ययन आणि शरिरसंवर्धन करता करता एक दिवस आपोआप तो १४ वर्षाचा मुलगा असहकार आंदोलनात सामील झाला. प्रथम जेव्हा तो मोर्चात पकडला गेला, तेव्हा फ़ौजदाराने तुला यातले काय समजते? उगाच चालले मोर्चे घेउन असे म्हणत सोडून दिले. हा पुन्हा मोर्चात गेला. यावेळी मात्र त्याला मॅजिस्ट्रेट खारेघाट यांचेपुढे उभे केले गेले. साहेबांनी माहिती विचाराला सुरुवात केली:
नाव? --- आझाद.
बापाचे नाव? --- स्वतंत्रता.
व्यवसाय? --- देश स्वतंत्र करणे.
पत्ता?------ जेलखाना.
बापजन्मात अशी उत्तरे न ऐकलेला खारेघाट पिसाळला आणि त्य १४ वर्षाच्या मुलाला १५ फ़टक्यांची शिक्षा दिली. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेल्या कसुरी वेताचे फ़टके मारताना कातडी फ़ाटून रक्त व मांस बाहेर येते असे, त्यामुळे ही शिक्षा ऐकताच अट्टल गुन्हेगार देखिल चळचळा कापत. मात्र हा मुलगा बेडर पणे म्हणाल कि मला तिकटीवर बांधाची गरज नाही, मारा तुम्ही. तुरुंगाधिकार्यांसह सारे लोक पहात राहीले. प्रत्येक फ़ट्क्याला तो मुलगा 'वंदे मातरम ' म्हणत होता. फ़टके पूर्ण झाल्यावर त्याची सार्या काशी गावात मिरवणुक निघाली, हारावर हार पडले. मग झालेल्या सत्कार सभेत पं. श्रिप्रकाश यांनी त्या मुलाचा उल्लेख चंद्रशेखर आझाद असा केला आणि तेव्हापासुन तेच नाव कायम झाले.
त्या १५ फ़टक्यांनी जीवनाचा अर्थच बदलला. माझ्याच देशात माझ्याच देशाला प्रणाम केला तर त्याबद्दल अमानुष मारहाण करणारे हे लोक म्हणजे माणसे नसुन सैतान आहेत. त्यांना समजेल अशीच भाषा यापुढे त्यांना लागु केली केली पाहिजे असा निष्कर्ष त्याने काढला. या हिंस्त्र पशूंना हाणलेच पाहीजे असा निश्चय त्यांनी केला. १९२२ साली अवसानघातकी पुढार्यांनी अचानक असहकार आंदोलन मागे घेतले आणि सर्वस्वाचा त्याग करुन आंदोलनात उतरलेले अनेक तरुण साफ़ ढासळले. २३ साली आझादांनी सचिंद्रनाथ संन्यालांच्या एच. आर. ए (हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिअशन) मध्ये प्रवेष केला. तिथे त्यांना अनेके समविचारी आणि ध्येयाने भारलेले धाडसी तरुण भेटले. भगतसिंह, सुखदेव, दत्त, राजगुरु, सावर्गावकर, पोतदार, भगवानदास, भगवतिचरण, बिस्मिल, अश्फ़ाकुल्ला, महाविरसिंह, डॉ. गयाप्रसाद, शिव वर्मा, परमानंद, मणीद्रनाथ, जतिन दास, असे अनेक धडाडीचे युवक एकत्र येताच 'ऍक्शन' ला सुरुवात झाली. ९ ऑगस्ट १९२५ ला काकोरी चा आगगाडिवरील हल्ला आझादांनी त्यांचे नियोजन व जबरदस्त साहस यांच्या जोरावर यशस्वी करुन सर्वमान्य नेतृत्त्व मिळवले. स्वतंत्र भारता बरोबरच संपन्न व शोषणमुक्त समाजाची स्वप्ने पहाणर्या या युवकांनी ९ सप्टेम्बर १९२९ रोजी एच.एस.आर.ए ची स्थापना केली. या संघटनेचे दोन प्रभाग होते. एक हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी जिथे प्रत्यक्ष कृति केली जाणार होती आणि दुसरा भाग म्हणजे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन - जिथे सहानुभुती असणारे परंतु प्रत्यक्ष कृतिमद्ध्ये सामिल न होता निधी संकलन, भुमिगतांना आसरा, क्रांतिकारकांना अन्न व आश्रय मिळवून देणे अशी कमे केली जाणार होती. आझाद दोहिंचे समन्वयक होते. एच.एस.आर.ए ने पहीलाच दणका दिला तो सॉडर्स ला भर दिवसा त्याच्या कचेरी समोर कंठस्नान घालून. या प्रसंगी आझादांनी आपल्या अचुक नेमेबाजीचे प्रात्यक्षिक दाखविले. राजगुरु व भगतसिंह हे निसटुन जाउ पहात असताना शिपाई छनान्सिंहाने त्याना अडवाचा प्रयत्न केला. पुढे भगतसिंह, त्याला पकडू पहाणारा छ्नान आणि छ्नान च्या मागे त्याला खेचणारे राजगुरु असे महाकठीण व धावते लक्ष्य संरक्षण फ़ळीची भूमिका निभावणार्या आझादांनी अचूक टिपले. आपल्याच माणसाची हत्या घडु नये म्हणून प्रथम पायावर व तरीही न ऐकल्यामुळे त्याच्या मणक्यात गोळी झाडुन आझादांनी त्याला टिपला.
काही व्यक्तिंचा मृत्यु हा त्यांच्या जिवनापेक्षा अधिक स्फ़ुर्तिदायक ठरतो, तसा आझादांचा ठरला. २७ फ़ेब्रुआरी १९३१ म्हणजे बरोबर ७४ वर्षांपूर्वी अलाहाबादच्या आल्फ़्रेड पार्क मध्ये आझादांनी वीर मरण पत्करले. मरताना त्यांनी आधी आपल्याब्रोबर असलेल्या सुखराजसिंहास तिथून जाण्यास भाग पाडले. एस.एस.पी. नॉट वॉबरच्या गोळीने माण्डीचे हाड मोडल्यानंतरही आझादांच्या मॉवजरच्या गोळीने त्याचा डावा हात उत्तरादाखाल मोडला. झुंजत असताना आझाद वारंवार पोलिसांना आवाहन करीत होते कि मला तुम्हाला माराची इच्छा नाही, तेव्हा मागे फ़िरा, आणि याच बंदुका गोर्यांवर रोखा. तसे केलेत तर त्यांना हा देश सोडुन जावा लागेल. आझाद फ़क्त नॉट्वॉबर वर नेम धरीत होते. दुसरीकडून डिएस्पी विश्वेश्वर सिंह ठाकुर यांनी नविन कुमक घेउन हल्ला केला. गोळी झाडुन ते झुडुपात लपले तेव्हा वर जाणार्या धूराचा अंदाज घेउन आझादांनी जी गोळी झाडली तीने त्यांचा जबडा फ़ोडला. एक विरुद्ध अनेक असा विषम संघर्ष किती वेळ चालणार? तरीही एकटे आझाद त्या फ़ौज फ़ाट्याला २२ मिनिटे झुंजवित राहीले. जेव्हा त्यांना शेवट दिसला तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या मॉवजरची नळी आपल्या उजव्या कानशिलाला लावली आणि डाव्या हातात देशाची मुठभर माती घेऊन चाप ओढला. मृत्यु नंतरही कोणी जवळ जायला धजेना. बराच वेळ मृतदेहावर गोळीबार चालु होता. बहुधा आपण बेसावध पणे जवळ जावे म्हणून आझाद नाटक करित आहेत असा पोलीसांचा कयस होता. अखेर एका शिपायाला पुढे जवळ जाउन गोळ्या झाडण्यास सांगीतले व मेल्याची पूर्ण खात्री झाल्यावर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. स्वत: नॉट वॉबर ने जबाब नोंदवला कि सुदैवाने हा मनुष्य माझ्या एक गोळीने सुरुवातीलाच जखमी झाला म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर आज याच्या ऐवजी आम्हा सर्वांची प्रेते सापडली असती.
दुर्दैवाने या महान क्रांतिकारकांची अवस्था आजही 'नाही चिर नाही पणती अशीच आहे.
साम्राज्य हादरवणारे 'वक्तव्य'
दिनांक १ जुलै १९०९ या दिवशी कर्झन वायलीला 'कॅक्स्ट्न सभागृहात' कंठस्नान घालून वज्रनिश्चयी मदनलाल धिंग्रा १७ ऑगस्ट रोजी पेंटनविले तुरुंगात ताठ मानेने व बेडरपणे फासावर गेला. न्यायाचे पुतळे म्हणवून घेणाऱ्या इंग्रजांनी त्यांच्या खिशात लिहून ठेवलेले 'वक्तव्य' बिनबोभाट जप्त केले व दडपूनही टाकले. मात्र हे लिखित वक्तव्य जरी जप्त केले तरी मदनलालजींनी त्याच आशयाचे वक्तव्य न्यायालयात केले. फाशी सुनावण्या पूर्वी न्यायाधीशाने जेव्हा 'तुला काही साक्षीदार, पुरावे वा बचावाचे भाषण सादर करायचे आहे का?' असे विचारले तेंव्हा त्यांनी फक्त इतकेच सांगितले की माझे वक्तव्य इथे वाचून दाखवले जावे. न्यायाधीशाने दुर्लक्ष केले व वारंवार मागणी केल्यावर असे काही आपल्याला माहीत नसून तुला काही सांगायचे असेल तर सांग, आम्हाला तुझे वक्तव्य वगरे माहीत नाही असे सांगताच मदनलालजींनी ठामपणे सांगितले की अटक झाली तेंव्हा 'ते एक तावभर लिहिलेले वक्तव्य माझ्या खिशात वधप्रसंगी होते व ते पोलिसांनी जप्त केले आहे' असे सांगितले. मग त्या वक्तव्याच्या अनुपलब्धतेकारण त्यांनी साधारण आठवेल असे भाषण न्यायालयासमोर केलेः
"हा देश जर्मनांनी पादाक्रांत केला असता त्यांच्याविरुद्ध एखाद्या इंग्रजाने लढणे हे जर न्याय्य असेल तर मी इंग्रजाविरुद्ध लढणे हे कितीतरी अधिक न्याय्य व देशाभिमानाचे आहे. गेल्या पन्नास वर्षांतील लक्षावधी हिंदुस्थानीयांच्या हत्येस मी इंग्रजांनाच उत्तरदायी समजतो व प्रतिवर्षी हिंदुस्थानातून १० कोटी पौंड आणण्यासही इंग्रजच उत्तरदायी आहेत. येथील इंग्रज जे आपल्या लोकांना करण्याचा उपदेश करतात व तेच करणाऱ्या माझ्या हिंदुस्थानांतील बांधवांना फाशी, काळेपाणी वा हद्दपारीच्या सजा देणाऱ्या इंग्रजांना उत्तरदायी मानतो. एक इंग्रज हिंदुस्थानात जाऊन दरमहा १०० पौंड कमावतो याचाच अर्थ तो माझ्या १००० गरीब देशबांधवांना देहान्ताची सजा देतो, कारण या कमाईवर हे जीव सहज जगले असते
ज्याप्रमाणे हा देश पादाक्रांत करायचा अधिकार जर्मनांना नाही त्याप्रमाणे इंग्रजांना हिंदुस्थान पादाक्रांत करायचा अधिकार नाही. आमची पवित्र भूमी भ्रष्ट करणाऱ्या इंग्रजांना आम्ही ठार करणे हे संपूर्णतः समर्थनीय आहे.एकीकडे हे इंग्रज कांगो व रशियातील पददलित जनतेचे कैवारी म्हणून मिरवीत आहेत त्याचवेळी ते हिंदुस्थानात जनतेचा भयानक छळ व अत्याचार करीत आहेत. मला त्यांच्या या ढोंगाचा व नाटकीपणाचा राग येतो व विस्मयही वाटते. जर उद्या हा देश जर्मनांनी जिंकला व रस्त्यावरून दिमाखाने जाणाऱ्या जर्मनांना एखाद्या इंग्रजाने ठार केले तर त्याचा देशभक्त म्हणून गौरव केला जाईल. मग मी तर माझ्या मातृभूमीच्या विमोचनासाठी खचितच सिद्ध आहे
मी हे वक्तव्य करीत आहे ते मला दया याचना करावयाची आहे म्हणून वा अन्य कोणत्याही स्वार्थी हेतूने नाही. इंग्रजांनी मला देहान्ताचीच शिक्षा द्यावी कारण तसे केल्याने माझ्या देशबांधवांचा प्रतिशोधही अधिक तीव्र होईल. हे वक्तव्य माझ्या ध्येयाची न्याय्यता बाह्य जगताला; विशेष करून युरोप व अमेरिकेतील सहानुभूतीकांना दाखविण्यासाठी मी न्यायालयापुढे करीत आहे "
दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमानपत्रात मथळे झळकले
'धिंग्राचे विलक्षण वक्तव्य', 'धिंग्रा म्हणतो माझा प्रतिशोध माझे देशबांधव घेतील!', 'मी देशभक्त आहे', 'धिंग्रा हिंदुस्थानच्या अभ्युदयासाठी मरतो आहे'
धिंग्रांच्या या वक्तव्याने सरकार वायलीच्या वधापेक्षा अधिक हादरले.
इकडे मानवतेच्या पुजाऱ्याने 'भ्याड कृत्य', 'असमर्थनीय वर्तन' वगरे पोपटपंची केली. नामदार गोखल्यांनीही सभेत निषेध व्यक्त केला. तिकडे इंग्रजांच्या खुशामतखोर हिंदी नागरिकांनी एक शोकसभा व निषेधसभा आयोजित केली. अध्यक्ष ना. आगाखान असून उपस्थितांमध्ये कुचबिहारचे महाराजकुमार, सय्यद हुसेन बिलग्रामी, के सी. गुप्त, सर मंचरजी भावनगरी, दिनशा पेटीट, फाजलभाइ करीमभाइ वगरे होते तर निमंत्रितांमध्ये बिपीनचंद्र पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादासाहेब खापर्डे, एम. पी. टी. आचार्य, व्ही. व्ही. एस. आचार्य व स्वा. सावरकर होते. निषेधाचा ठराव मताला येताच अध्यक्ष म्हणाले म्हणजे 'सर्वांनाच मंजूर आहे तर'. "नाही, सर्वांना अजिबात नाही." एक दमदार निग्रही आवाज आला आणि सन्नाटा पसरला. आगाखान संतप्त झाले, भावनगरी धावून आले तर पामर नामक इंग्रज ते प्रखर राष्ट्राभिमानी उद्गार काढणाऱ्या स्वा. सावरकरांवर तुटून पडला व त्याने त्यांच्या नाकावरती भुवयांमध्ये ठोसा मारला. स्वा. सावरकरांचा चष्मा फुटून काच लागल्याने चेहऱ्यावर रक्त आले. संतप्त अय्यरांनी पामरवर बेभान होत पिस्तुलाला हात घातला, मात्र त्यांना स्वा. सावरकरांनी नजरेनेच दाबले, मात्र आचार्यांनी पामरच्या टाळक्यात काठी हाणली व अखेर अभूतपूर्व गोंधळात सभा उधळली गेली.
मुळात हे कृत्य करण्यात प्रेरणा व योजना स्वा. सावरकरांचीच असा सरकारच ठाम समज होता. अर्थात धिंग्रांच्या वक्तव्यातील भाषा पाहता ते अगदी स्वाभाविकच होते. लंडन टाईम्सने तर मागे एकदा म्हटलेच होते की भले विध्वंसक मार्गाचा अवलंब करण्यात बंगाल नजरेत भरत असेल, पण ज्यांनी या चळवळीला जन्म दिला आणि तिचे संगोपन केले ते बहुधा पश्चिम भारतात सापडतील. दि. ३ जुलै १९०९ ला लंडन टाइम्स म्हणतो ' अराजकवाद्यांच्या कार्याला यापुढे लंडन व पॅरिस येथून अधिकाधिक व कलकत्ता आणि पुणे येथून कमी मार्गदर्शन मिळेल' आता लंडन म्हणजे स्वा. सावरकर आणि पॅरिस म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा हे उघडच आहे.
आपले धुरीण मदनलालजींच्या हौतात्म्याला बदनाम करीत असताना लाला हरदयाळ, खापर्डे, श्यामजी, स्वा. सावरकर हे त्यांची प्रशंसा करीत होते. हिंदुस्थानी क्रांतिकारकच नव्हे तर जगाने या बलिदानाची तारीफ केलीः
लॉईड जॉर्ज यांनी मदनलाल धिंग्रांची एक देशभक्त अशी माझ्याकडे अतिशय गाढ प्रशंसा केली आणि माझीही तीच भावना आहे. रेग्युलस, प्लुटार्कस व कॅरॅक्ट्स यांच्या प्रमाणेच धिंग्राही दोन हजार वर्षांनंतरही स्मरला जाईल आणि त्याचे अखेरचे वक्तव्य म्हणजे देशभक्तीच्या भावनेने उच्चारलेले सुंदरातले सुंदर शब्द आहेत --- विन्स्टन चर्चिल.
हिंडमनचे 'जस्टीस', दि. १० जुलै ' दडपशाहीच दहशतवादाला जन्म देते'
१३ जुलै रोजी लंडन टाईम्सला लिहिलेल्या पत्रात श्यामजी कृष्णवर्मा लिहितात ' मदनलाल धिंग्राचे नाव ज्याने आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्राणांची आहुती दिली असा हुतात्मा म्हणून भावी पिढ्यांना ज्ञात होईल. त्यांच्या अंतिम भाषणातून प्रतींत होणाऱ्या धैर्य, सत्य आणि देशभक्ती यांनी त्यांना जगाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च स्थानावर विराजमान केले आहे.
'धिंग्रांची बेदरकर आणि उद्दंड वृत्ती बऱ्याच इंग्रजांना विस्मयाची वाटली' - लंडन टाइम्स.
'आपल्या देशासाठी सर्वस्व देणाऱ्या धिंग्रांचा आयर्लंड सन्मान करीत आहे' - असे लिहिलेली पत्रके व १२ इंची अक्षरांनी रंगलेल्या भिंती डब्लीन परिसरात दिसून येत होत्या.
लॉर्ड किचनेरने केलेल्या अत्याचारांचा बदला घेतला नाही म्हणून इजिप्तच्या बोत्रास पाशाचा वध करणारा देशभक्त इब्राहिम बारादानी व मदनलाल धिंग्रा यांच्यावर इजिप्तचे राष्ट्रीय बाण्याचे कवी इ. एल. घयाती यांनी एक सुंदर कविता रचली व त्याबद्दल त्याना एक वर्ष कारावास झाला.
' ख्रिश्चन धर्मातील कुणीही क्रांतिकारक धिंग्रां इतक्या बेडरपणे व उदात्तपणे न्याधिशांसमोर उभा राहिला नाही.धिंग्रांच्या निर्भय बाण्याची ५०० माणसे जर एकवटली तर हिंदुथान स्वतंत्र होईलच यावर आज माझे व खापर्डे यांचे एकमत झाले' - विल्फ्रेड स्कावेन ब्लंट (विद्वान इंग्रज लेखक व स्वा. सावरकर यांचा चाहता)
मदनलाल धिंग्रा यांचे सरकारने दाबून टाकलेले वक्तव्य स्वा. सावरकरांनी एक स्वातंत्र्यप्रेमी इंग्रज डेव्हिड गार्नेट याच्या साहाय्याने अखेर १८ ऑगस्ट १९०९ च्या 'डेली न्यूज' मध्ये प्रसिद्ध केलेच. सरकारने सर्व अंक जप्त केले मात्र हे भाषण सर्वतोमुखी झाले.
हे मूळ वक्तव्य व धिंग्राचे प्रकाशचित्र असलेले टपाल पत्र स्वा. सावरकरांनी प्रसिद्ध केले व त्याच्या विक्रीतून आलेले पैसे राष्ट्रकार्याच्या निधीत जमा केले.